‘रेमडेसीवीर’चा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक’

0
420

 – खासगी रूग्णालयांची अचानक होणार तपासणी, नगरसेविका सीमा सावळे यांच्या मागणीची महापालिका आयु्क्तांनी घेतली तात्काळ दखल

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – कोरोनाबाधीत रूग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडेसीवीर इंजेक्शनचा खासगी रूग्णालयांमार्फत होणारा काळाबाजार रोखण्यासाठी पिंपरी – चिंचवड महापालिकेच्यावतीने भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे. या भरारी पथकामार्फत रूग्णालयांना अचानक भेटी देऊन रेमडेसीवीर इंजेक्शनचा गरजू रूग्णांसाठीच वापर होत आहे किंवा नाही, याची तपासणी केली जाणार आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. जेष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी त्याबाबत दोन दिवसांपूर्वी लेखी मागणी केली होती. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी त्याची तात्काळ दखल घेतली आणि आदेश जारी केला.

पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आणि नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका हद्दीतील सरकारी तसेच खासगी रूग्णालयांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. या रूग्णालयांमध्ये कोरोना संबंधी देण्यात येणाNया रूग्णसेवा, त्यापोटी आकारली जाणारी शुल्कप्रक्रीया, बेडसची संख्या, रूग्णांचा दैनंदीन डिस्चार्ज अहवाल आणि इतर प्रशासकीय कामकाजाकरिता महापालिकेचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली कामकाज करण्यासाठी रूग्णालयनिहाय अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात रूग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना बाधीत रूणांची सख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. त्यामुळे नव्याने खासगी रूग्णालयांना कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, काही खासगी रूग्णालयांमध्ये रूग्णसेवेत गंभीर त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे.

खासगी रूग्णालयांमध्ये रेमडेसीवीर इंजेक्शनचा अनावश्यक वापर वाढल्याचे आढळून येत आहे. सरकारकडून पुरवठा होणारा मर्यादीत साठा आणि इंजेक्शनचा अनावश्यक वापर यामुळे इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ज्या रूग्णाला गरज आहे, त्याला वेळेवर तातडीने रेमडेसीवीर इंजेक्शन मिळत नाही. बाजारात थेट पद्धतीने रेमडेसीवीर इंजेक्शनची विक्री करण्यास मनाई असताना अनेक खासगी रूग्णालयांमार्फत नातेवाईकांना रेमडेसीवीर इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगितले जाते. त्यामुळे या इंजेक्शनचा काळाबाजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याबरोबरच बनावट रेमडेसीवीर प्राप्त होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

बेड उपलब्ध करून देतानाही खासगी रूग्णालयात हेतुपुरस्पर बेड उपलब्ध नसल्याचे पहिल्यांदा सांगितले जाते. त्यानंतर अधिकचे शुल्क आकारून किंवा वशिल्याने बेड उपलब्ध करून देण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले आहेत. महापालिकेने कोरोना उपचारासाठी परवानगी दिलेल्या रूग्णालयांमध्ये सोयी-सुविधा व मनुष्यबळ उपलब्ध आहे किंवा नाही याचीही खातरजमा वैद्यकीय विभागामार्फत करून घेणे आवश्यक आहे. या बाबी विचारात घेऊन रेमडेसीवीर इंजेक्शनचा खासगी रूग्णालयांमार्फत होणारा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथक नियुक्त करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांच्या नियंत्रणाखाली नियुक्त केलेल्या कर्मचाNयांची या पथकात नेमणूक करण्यात आली आहे. रेमडेसीवीर इंजेक्शनचा गरजू रूग्णांसाठीच वापर होत आहे किंवा नाही, याची तपासणी पथकामार्फत रूग्णालयांना अचानक भेटी देऊन केली जाणार आहे. इंजेक्शनचा साठा आणि झालेला वापर तपासण्यासाठी रूग्णालयातील वैद्यकीय कागदपत्रांची तपासणी करून इंजेक्शनचा अनियंत्रित वापर करणाNया रूग्णालयांवर कारवाई केली जाणार आहे.

महापालिकेने निश्चित केलेल्या स्मशानभुमींमध्ये कोरोना बाधीत मृत रूग्णांचे पारंपारीक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य मोफत पुरविण्यात येते. परंतु, त्याठिकाणी पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन स्मशानभुमीच्या दर्शनी भागावर ’कोरोना बाधीत मृत रूग्णांचे पारंपारीक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही’ अशा आशयाचा फलक तातडीने लावण्यात यावा. मृत रूग्णांच्या नातेवाईकांकडे पैशाची मागणी करणे अथवा तशा तक्रारी येऊ नये, यासाठी महापालिका सुरक्षा विभागाने स्मशानभुमीत अचानक गस्त घालून पाहणी करावी. पैसे मागण्याचे गैरकृत्य करताना आढळून आल्यास अथवा तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितावर तात्काळ फौजदारी कारवाई करावी, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.