Banner News

रेडझोनचा प्रश्न लवकरच सुटेल – खासदार डॉ. अमोल कोल्हे

By PCB Author

August 01, 2019

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील लष्करीच्या हद्दीतील रेडझोनच्या प्रश्नांबाबत सखोल अभ्यास केला जाईल. तसेच हा प्रश्न सोडविण्यासाठी संरक्षणमंत्र्यांची भेट घेऊन मार्ग काढला जाईल, असे सांगून     रेडझोनचा प्रश्न लवकरच सुटेल, असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच खासदार डॉ. कोल्हे पिंपरीमध्ये आज (गुरूवार) आले होते. यावेळी त्यांनी महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी शहरातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली. त्यानंतर महापालिकेत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मंगला कदम, वैशाली घोडेकर, प्रशांत शितोळे, वैशाली काळभोर, प्रज्ञा खानोलकर आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार कोल्हे म्हणाले की, रेडझोनच्या प्रश्नाबाबत आयुक्तांशी चर्चा केली. रेडझोनमध्ये  बांधकाम केलेल्या नागरिकांच्या कोणत्याही सोयीसुविधा काढून घेतल्या जाणार नाहीत. मात्र, नवीन बांधकामांना सुविधा देणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले. रेडझोनचा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्याने याची सखोल माहिती घेऊन अभ्यास केला जाईल. या प्रश्नाबाबत कोणत्या मुद्द्यांचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा लागेल, याची माहिती महापालिकेकडून घेऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही डॉ. कोल्हे यांनी दिली.