Maharashtra

रेखा जरे यांच्या हत्येला महिना उलटूनही आरोपी बाळ बोठेला अटक नाहीच, नगरमध्ये तीव्र पडसाद

By PCB Author

December 31, 2020

अहमदनगर, दि. ३१ (पीसीबी) : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येला 1 महिना पूर्ण झालाय, मात्र, अद्यापही या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक झालेली नाही. आरोपी बाळ बोठे फरार असल्याने या निषेधार्थ आज (30 डिसेंबर) अहमदनगर शहरात कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठेला लवकरात लवकर अटक करण्याची मागणीही करण्यात आली. नगरमधील विविध स्वयंसेवी संघटनांनी हा कँडल मार्च काढला होता.

रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीला महिना उलटूनही अटक न झाल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्याचपार्श्वभूमीवर बाळ बोठेच्या अटकेची मागणी करत जरे कुटुंबीय आणि स्वयंसेवी संघटनांच्या वतीने कापड बाजार ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत कँडल मार्च काढण्यात आला. यामध्ये सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. यावेळी सर्वांनी जरे यांच्या हत्येचा निषेध करून सूत्रधार असलेला आरोपी पत्रकार बाळ बोठे याला लवकरात लवकर पोलिसांनी अटक करावी अशी मागणी केली. तसेच अटक न झाल्यास प्रसंगी आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला.

बाळ बोठेचा पाय आणखीच खोलात, आता खंडणीचा गुन्हा दाखल दरम्यान, रेखा जरे हत्याकांडमधील फरार आरोपी बाळ बोठेचा पाय आणखीनच खोलात गेला आहे. सुपारी, हत्या आणि विनयभंग अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाल्यानंतर आता खंडणीचाही गुन्हा बाळ बोठेवर दाखल झाला आहे. नोकरी घालवण्याची भीती घालून दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप एका महिलेने केला असून नगरच्या तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये बोठेवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. बोठेने नोकरी घालवण्याची भीती घालून दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. तसंच वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित करुन आपली बदनामी केल्याचा बोठेवर आरोप करण्यात आला आहे. मंगल किसन हजारे असं महिला फिर्यादीचे नाव आहे. बोठेसह वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत दहीफळे यांचंही यामध्ये नाव घेण्यात आलं आहे. तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.