Desh

रुपयापाठोपाठ शेअर बाजारातही घसरण; सेन्सेक्स २३० अंकांनी घसरला

By PCB Author

October 03, 2018

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – डॉलरच्या तुलनेत घसरलेला रुपया आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत झालेली वाढ याचा परिणाम आज (बुधवारी) शेअर बाजारावर झाला. सेन्सेक्स जवळपास २०० अंकांनी घसरला असून निफ्टीही ८३. ८० अंकांनी घसरुन १०, ९२४. ५० वर पोहोचले आहे.

कच्चा तेलाच्या किंमतीत झालेली वाढ, रुपयाचा ऐतिहासिक तळ आणि रिझर्व्ह बँकेची व्याजदर निश्चितीसाठी आजपासून सुरु होणारी बैठक या घडामोडींचे पडसाद शेअर बाजारावर उमटले. बुधवारी सकाळी शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्समध्ये  २३० अंकांची घसरण झाली. सेन्सेक्स ३६, २९५. २८ वर पोहोचला आहे. तर निफ्टीतही  ८३. ८० अंकांची घसरण झाली आणि निफ्टीचा निर्देशांक १०, ९२४. ५० वर पोहोचला.

स्पाइस जेट, जेट एअरवेज आणि इंटरग्लोब एव्हिएशनच्या शेअर्सच्या दरात घसरण झाली असून कच्चा तेलाच्या किंमतीचा फटका या कंपन्यांना बसला. तर येस बँकेच्या शेअरची आगेकूच सुरुच आहे. सलग दुसऱ्या दिवशी या बँकेच्या शेअर्सचा भाव वधारला आहे. एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, मारुती सुझूकी, भारती इन्फ्राटेल, अॅक्सिस बँक आणि एल अँड टी या कंपन्यांच्या शेअर्सच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे.