Desh

रुग्णांना ऑक्सिजनची मदत करणार्‍या तरुणावर पोलिसांची कायदेशीर कारवाई

By PCB Author

May 02, 2021

लखनऊ, दि.०२ (पीसीबी) : जिल्हा रुग्णालयात बेड शोधू न शकलेल्या रूग्णांना मोफत ऑक्सिजन सिलिंडर्स पुरवण्यास मदत करणाऱ्या तरूणाविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे धक्कादायक घटना उत्तर प्रदेश मधील जौनपूर मधून समोर आली आहे.  रूग्णांना मोफत ऑक्सिजन सिलिंडर्स पुरवण्यास मदत करणाऱ्या तरूणाने कोविड -१९ च्या सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत जौनपूर जिल्हा वैद्यकीय विभागाने पोलिसांत तक्रार दाखल केली.

विकी अग्रहरि नावाचा हा तरूण जिल्हा रूग्णालयाबाहेर रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करून मदत करत होता. रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की विकी अनेकांना कोविड -१९ ची चाचणी न करता, असुरक्षित पद्धतीने, स्वच्छता न करता आणि इतर वैद्यकीय खबरदारी न घेता ऑक्सिजन पुरवत होता. यामुळे एखाद्या व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीस संसर्ग पसरला जाऊ शकतो.  पोलिस तक्रारीत सीएमएसने साथीच्या रोग अधिनियमांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली.

उत्तर प्रदेशातील कोरोना बाधित रुग्ण वेळेवर रूग्णालयाच्या खाटाआणि ऑक्सिजन सिलिंडर मिळविण्यासाठी धडपडत असताना एका चांगले काम करणाऱ्या गौरवण्याऐवजी अशा व्यक्तीवर कारवाईसाठी सरसावलेल्या पोलिस आणि प्रशासनावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे.