Maharashtra

रुग्णवाहिका न मिळाल्याने अभिनेत्रीसह तिच्या नवजात बाळाचा मृत्यू

By PCB Author

October 23, 2019

हिंगोली, दि.२३ (पीसीबी) – राज्याची मान शरमेने खाली घालायला लावणारी तसेच संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मराठी चित्रपटात काम करणाऱ्या एका अभिनेत्रीला वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने तिचा व तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना २० ऑक्टोबर रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास हिंगोलीतील सेनगाव तालुक्यात घडली आहे.

पूजा जुंजर (वय २५) असे  या अभिनेत्रीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीतील गोरेगाव येथील एका प्राथिमक आरोग्य केंद्रात पूजा जुंजर हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. परंतु, त्यानंतर तिची प्रकृती बिघडली. बाळाच्या जन्मानंतर केंद्रातील डॉक्टरांनी तिला हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. हे अंतर जवळपास ४० किलोमीटर इतके होते. पुढील उपचारासाठी तिला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. पण यासाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध नव्हती. दुसरी रुग्णवाहिका येण्यास उशीर झाल्याने पूजाचा मृत्यू झाला. तिला वेळेवर रुग्णवाहिका मिळाली असती तर तिचा व तिच्या बाळाला वाचवता आले असते, असे तिच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. या प्रकरणाची पोलिसांनी नोंद करून घेतली आहे आणि पूजाच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवला आहे. पूजाने दोन मराठी चित्रपटात मुख्य भूमिका केल्या आहेत. बाळंतपणासाठी पूजाने काही दिवसांपासून सुट्टी घेतली होती.