“रुग्णवाढीचा आलेख स्थिरावला तरी गाफील राहून चालणार नाही” : खा. डॉ. अमोल कोल्हे

0
210

 – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जम्बो कोविड हॉस्पिटल व वॉर रुमला भेट देत घेतला आढावा

पिंपरी, दि. ३० ( पीसीबी) – महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसांतील आकडेवारी पाहिली तर रुग्णवाढीचा आलेख काहीसा स्थिरावला आहे ही दिलासादायक बाब आहे. हा दिलासा असताना आपण गाफील राहून चालणार नाही. नागरिकांनी आजार अंगावर न काढता योग्य वेळी चाचणी, निदान व उपचार घेतले पाहीजे असे मत शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधक उपचारांसाठी उभारलेल्या ऑटो क्लस्टर, आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथील जम्बो कोविड हॉस्पिटल, नवीन भोसरी हॉस्पिटल आणि महापालिकेच्या कोविड वॉर रुमला भेट दिली. यावेळी सरकारी व खासगी कोविड हॉस्पिटलमधील ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व आयसीयू बेडची उपलब्धता, बेडचे व्यवस्थापन, रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता, दैनंदिन चाचण्यांची संख्या, पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या, वैद्यकीय उपचार पद्धती, हेल्पलाईनची उपयुक्तता व अन्य आवश्यक सोयीसुविधांचा आढावा घेतला. तसेच नागरिकांच्या लसीकरण मोहीमेचा देखील आढावा घेतला.

खा. कोल्हे म्हणाले की, दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मी आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये भेट देत आढावा घेतला. यामध्ये असे निदर्शनास आले की, ४० ते ४५ टक्के रुग्ण हे ग्रामीण भागातून शहरात उपचारासाठी दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाचे म्हणजे कोरोनाचे वेळीच अचूक निदान होणे हे आहे. आजार अंगावर काढला नाही, योग्य वेळी चाचणी करून घेतली. कोविडची लक्षणे दिसत असली किंवा कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आपण आलो तर वेळेत चाचणी आणि तात्काळ वैद्यकीय उपचार घेतले तर बरे होण्याचे प्रमाण ९७ ते ९८ टक्के इतके आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा, प्रशासन आणि सरकार यांची जितकी जबाबदारी आहे. तितकीच आरोग्य जपण्याचे स्वत:ची देखील जबाबदारी आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या प्रसंगी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर योगेश बहल, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक विक्रांत लांडे, नगरसेवक अजित गव्हाणे, शाम लांडे, देविदास गोफणे, भरत लांडगे, अमित लांडगे, भाजपा नगरसेवक रवी लांडगे डॉ. अनिल रॉय, डॉ. पवन साळवे, श्री. ढाकणे, डॉ. संग्राम कपाले, डॉ. प्रिती व्हिक्टर, डॉ. ढगे आदी उपस्थित होते