रा.स्व.संघाचे विजयादशमी शस्त्रपूजन उत्सव व पथसंचलन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात रद्द

0
343

पिंपरी, दि.२३ (पीसीबी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रतिवर्षी विजयादशमीला पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी शस्त्रपूजन व पथसंचालनाचे आयोजन करण्यात येते. मात्र यावर्षी शहरातील कोरोनाचा प्रादुर्भवामुळे खबरदारी म्हणून रा.स्व. संघाने आपले शस्त्रपूजन जाहीर स्वरूपातील उत्सव, एकत्रीकरण आणि पथसंचलनाचे कार्यक्रम रद्द केले आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याचे संघचालक डॉ. गिरीश आफळे यांनी दिली आहे.

कोरोना प्रसार रोखण्या करिता सोशल डिस्टंसिंग व इतर सर्व नियमांचे समाजाने पालन करावे आणि कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्रशासनासोबत सहभागी व्हावे. या करिता पिंपरी चिंचवड शहरात रा.स्व.संघ गेली ९ महिन्या पासून विविध सामाजिक उपक्रम द्वारे सक्रीय आहे. गरजुंना जेवण डबे व अन्नधान्य पुरवठा, स्थलांतरिताना सहाय्य, करोना तपासणी अभियान , प्रतिबंधक उपाययोजना ,मदत कार्य, रक्तदान शिबिरे इत्यादीचे प्रभावी आयोजन करीत आहे. स्थानिक प्रशासनालाही या कार्यात सहकार्य करीत आहे.

यावर्षी कोरोनामुळे विजयादशमीचा उत्सव ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक शाखा स्तरावर साजरा करण्यात येणार आहे. त्याच बरोबर संघाचे स्वयंसेवक समाज तसेच कुटुंब प्रबोधन पर व्याख्यानमाला,रक्तदान शिबिरे, निबंध, वक्तृत्व, घोषवाक्य, चित्रकला इत्यादी स्पर्धा यासारखे अनेक समज जागरणाचे कार्यक्रम आयोजीत करत आहेत. या सर्व कार्यक्रमामध्ये विविध वयोगटातील बाल, तरुण, माता भगिनी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असून या उपक्रमांना उस्फुर्त प्रतिसाद देत आहेत.

रविवारी २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता नागपूर येथील संघ मुख्यालयात विजयादशमी निमित्ताने साजरा होणार ऑनलाईन उत्सव व पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे भाषण सर्व समाजाने सहकुटुंब पाहावे व ऐकावे, असे आवाहनही या निमित्ताने करण्यात येत आहे.