राहूल गांधींच्या ‘त्या’ फोनमुळे विखेंचा भाजपप्रवेश लांबणीवर?

0
587

नगर, दि. १३ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत वा आधी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे जवळपास ठरले असताना काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या फोनमुळे राधाकृष्ण विखेंचा भाजप प्रवेश थांबल्याची जोरदार चर्चा विखे समर्थकांमध्ये आहे. दरम्यान, मोदी यांची सभा विखेंनी एका समर्थकाच्या घरी टीव्हीवर पाहिल्याचे सांगितले जाते. ही सभा संपून मोदी व मुख्यमंत्री फडणवीस रवाना झाल्यावर सायंकाळी विखेंनी पुन्हा प्रचार नियोजनात भाग घेतल्याचेही समजते.

पुत्र डॉ. सुजयने भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्याच्या पाठोपाठ राधाकृष्ण विखेही भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात होते. भाजप प्रवेश करताना काँग्रेसचे काही आमदारही ते समवेत आणणार असल्याचेही बोलते जात होते. या पार्श्वभूमीवर डॉ. सुजय यांच्यासाठी नगरला होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतच विखेंचा भाजप प्रवेश होण्याची जोरदार चर्चा होती. तसा निर्णयही झाल्याचे सांगण्यात येत होते. पण अखेर हा प्रवेश शुक्रवारी झाला नाही. त्यामागील कारणांचा शोध घेतला असता विखे समर्थकांकडूनच, ‘राहुल गांधींच्या फोनमुळे आमचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला,’ असे खासगीत स्पष्ट केले गेले. ‘तुमच्या भावना समजतात, तुमच्यावर अन्याय झाल्याचेही जाणवते, पण थोडे थांबा,’ असे राहुल गांधी विखेंना म्हणाल्याचेही सांगितले जाते. त्यामुळेच विखेंनी भाजप प्रवेश ऐनवेळी रद्द केल्याचे सांगितले जाते.