Pune

राहुल शेवाळेंचे माझ्याविरोधात षडयंत्र ; मानहानीचा दावा ठोकणार – सुप्रिया सुळे

By PCB Author

April 18, 2019

पुणे, दि. १८ (पीसीबी) निवडणुका तीन दिवसांवर आल्या असताना अशा पद्धतीने माझ्यावर खोटा आरोप केला जात आहे.  आमच्या पक्षातून अनेक जण भाजपमध्ये गेलेत ते काही एकटेच नाहीत. एक महिला आहे म्हणून अशा पद्धतीने घाण राजकरण केले जात आहे. मी जर धमकी दिली असेल तर त्यांनी माध्यमांकडे जाण्याची गरज नव्हती. पोलीस  ठाण्याला का गेले नाहीत? असा सवाल करून राहुल शेवाळेंच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकणार आहे, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया  सुळे यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी  सोडून गेलेल्या राहुल शेवाळे यांना धमकी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. यावर सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

माझ्या विरोधात त्यांच्याकडे काहीच नाही, त्यामुळे खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले जात आहे. मी मानहानीचे  गुन्हा दाखल करणार आहे.  त्यांना भीती वाटत होती तर ते पोलीसांच्याकडे  का गेले नाहीत. एक महिला यशस्वी होत आहे,  हे त्यांना बघवत नाही. माझी बोलायची पद्धत अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. माझे काम पाहिलेले आहे. मी माझा सुसंस्कृतपणा सोडलेला नाही, असेही सुळे यांनी सांगितले.

दरम्यान, या ऑडीओ  क्लिपमध्ये सुप्रिया सुळे यांनी फोनवरून शेवाळे यांना धमकी दिल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये ‘तुम्ही भाजपात गेलाय, हे ठीक आहे.. एक लक्षात ठेवा, राहुल शेवाळे सुप्रिया सुळेच्या नादी लागू नका. मी कॉन्ट्रॅक्टर नाही, घरात येऊन ठोकून काढेन. आय ऍम सिरियस. माझी बदनामी केली ना, तर अब्रुनुकसानीचा दावा करेल. तुम्ही सगळे उलटतायत आता. माझ्यासारखी वाईट बाई नाही, मी खरी बाई आहे लक्षात ठेवा.. रेकॉर्ड केले तरी चालेल, ‘ असे सुप्रिया सुळे यांनी म्हटल्याचा दावा केला आहे.