राहुल गांधी हिंदू आहेत की नाही हे माहित नाही- मिलिंद परांडे

0
452

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे हिंदू आहेत की नाही, हे माहीत नाही. पण जर ते हिंदू धर्माचे अनुकरण करणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करतो, असे विश्व हिंदू परिषदेचे नेते मिलिंद परांडे यांनी म्हटले आहे.

विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महासचिव मिलिंद परांडे यांनी लखनौत पत्रकार परिषद घेतली. राहुल गांधी यांनी नुकतीच मानसरोवर यात्रा केली. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर परांडे यांनी प्रतिक्रिया दिली. परांडे म्हणाले, राहुल गांधी हे हिंदू आहेत की नाही हे मला नाही माहित. पण जर ते हिंदू धर्माचे अनुकरण करणार असतील तर मी त्यांचे स्वागतच करेन. भारतात प्रत्येकानेच हिंदू धर्माचे अनुकरण केले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न न्यायालयीन लढाईत अडकला आहे. पण यावर लवकरच तोडगा निघेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षभरात देशभरात विहिंपशी ३२ लाख जण जोडले गेले. आता विश्व हिंदू परिषदेत महिलांना स्थान दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच इंदूरमध्ये बोहरी मुस्लिमांच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावरही विहिंप नाराज असल्याचे दिसते. ‘मोदी तिथे का गेले हे त्यांनाच माहिती. त्यांच्या डोक्यात काय विचार सुरू आहेत हे आम्हाला नाही माहीत, असे सांगत त्यांनी याबाबत अधिक भाष्य करणे टाळले.