Desh

राहुल गांधी व्यसनी, पंतप्रधानपदासाठी लायक नाहीत – मनजिंदर सिंग सिरसा

By PCB Author

June 07, 2018

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे व्यसनी आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदावर विराजमान होण्याची त्यांची लायकी नाही, असे वादग्रस्त विधान शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी केले आहे.  

दिल्लीतील राजौरी गार्डन पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून मनजिंदर सिंग सिरसा हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. मनजिंदर सिंग सिरसा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत राहुल गांधी विमानतळावर रांगेत उभे असल्याचे दिसत आहे. या ट्विटमध्ये सिरसा यांनी म्हटले आहे की, जो पंजाबमधील ७० टक्के तरुणांना अमली पदार्थांचे व्यसन आहे, असे म्हणत होता, तोच आज व्यसनी दिसत आहे. त्यांनी व्यसनमुक्ती केंद्रात जायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी आधी कर्जमाफीचे आश्वासन पंजाबमध्येही दिले होते. मात्र, निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी आता नरेंद्र मोदी सरकारने कर्ज माफ करावे, अशी मागणी केली आहे . आता मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांचीही राहुल गांधींकडून फसवणूक केली जात आहे, अशी खोटारडी व्यक्ती पंतप्रधानपदाची दावेदार होऊ शकत नाही, असे सिरसा यांनी म्हटले आहे.