राहुल गांधी मुर्ख आहेत, त्यांना राफेल कराराचे ज्ञान नाही –  रविशंकर प्रसाद भडकले

559

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर राफेल करारासंदर्भात केलेले आरोप आणि वापरलेल्या ‘चोर’ या शब्दावर केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षाने आक्षेप नोंदवताना राहुल गांधींनी केलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. ‘राफेल कराराबाबत खोटे आरोप करणारे राहुल गांधी हे मुर्ख असून त्याना आपल्याला शिकवावे लागेल’, अशा शब्दात केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर पलटवार केला आहे. गांधी घराणे भ्रष्ट्राचाराचे उगमस्थान असल्याचा आरोपही प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत केला.

स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत पंतप्रधानांसाठी अशा शब्दाचा प्रयोग कुणीही केला नव्हता, राहुल गांधी यांच्याकडून यापेक्षा आणखी वेगळी अपेक्षा करताही येणार नाही. राहुल गांधी केलेल्या आरोपांवर देशही विश्वास ठेवणार नाही आणि जगही विश्वास ठेवणार नाही असे म्हणत राफेल करार नेमका काय आहे याबाबतची योग्य माहिती राहुल गांधींना नसल्याचे ते म्हणाले.

राफेल प्रकरणात रिलायन्स कंपनीचे नाव काँग्रेस प्रणित यूपीए सरकारच्या काळापासून चर्चेत होते आणि तसे आमच्याकडे पुरावे असल्याचे प्रसाद म्हणाले. अंबानी यांना करारात सहभागी करुन घेण्याचा निर्णय फ्रान्स सरकारचाच असल्याचेही ते म्हणाले. यूपीएने केलेल्या राफेल करारातील किंमतीपेक्षा आताची विमानांची किंमत २० टक्क्यांनी कमी असल्याचेही ते म्हणाले.