Desh

राहुल गांधी पुन्हा विदेश दौऱ्यावर

By PCB Author

May 19, 2022

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) : गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधील बडे नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. त्यातच आता राहुल गांधी देखील विदेश दौऱ्यावर निघून गेले आहेत. राहुल गांधी काल तिथल्या भारतीयांना संबोधित करण्यासाठी लंडनला (London) रवाना झालेत. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी ‘आयडियाज फॉर इंडिया’ या परिषदेत सहभागी होणार आहेत. काँग्रेस मीडिया विभागाचे प्रमुख आणि सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं की, राहुल गांधी अनिवासी भारतीयांशीही देशाच्या वर्तमान आणि भविष्याबाबत संवाद साधतील. 23 मे रोजी राहुल गांधी केंब्रिज विद्यापीठात ‘आधुनिक भारतासाठी आव्हानं आणि मार्ग’ या विषयावर उपस्थित लोकांशी संवाद साधणार आहेत. लंडनमध्ये आज ‘आयडियाज फॉर इंडिया’ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस नेते सलमान खुर्शीद आणि प्रियांक खर्गे हे देखील उपस्थित असणार आहेत.

दरम्यान, राहुल गांधी परदेश दौऱ्यावर असताना काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय. त्यामुळं पक्षात सध्या चिंतेचं वातावरण आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तयारीत भारतीय जनता पक्ष पूर्णपणे गुंतला असताना हार्दिक पटेल यांनी काँग्रेसची साथ सोडलीय. यापूर्वी काँग्रेसचे माजी पंजाब युनिट प्रमुख सुनील जाखड यांनी देखील क्षाला सोडचिठ्ठी दिलीय. त्याचवेळी काँग्रेसनं निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याशी मॅरेथॉन चर्चा केली. त्यांनी पक्षाच्या समितीत सहभागी होण्याची ऑफर नाकारलीय. हार्दिक पटेल आता लवकरच भाजपा मध्ये प्रवेश कऱणार आहे.