राहुल गांधी, पंतप्रधानांच्या गळाभेटीवर काँग्रेसची मुंबईत फलकबाजी

0
521

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – संसदेतील सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावादरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली होती. त्यानंतर काँग्रेसने  आपल्या निवडणूक प्रचाराची नवी टॅगलाईन तयार  केल्याचे दिसून येत आहे. याची प्रचिती आज (रविवारी) मुंबईतील अंधेरी भागात फलकातून दिसून आली. नफरस से नहीं, प्यार से जीतेंगे… या टॅगलाईनसह राहुल-मोदींच्या गळाभेटीचा फोटोही फलकावर लावण्यात आला आहे. अमित शहांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून ही फलकबाजी करण्यात आ ल्याची चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी (दि.२०) संसदेत मोदींची गळाभेट घेतली होती. यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. देशभरात सध्या ज्या प्रकारे द्वेषाचे वातावरण दिसत असून लोकांना जमावाकडून मारहाण होत आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी आपल्या भाषणातून आणि पंतप्रधान मोदींच्या गळाभेटीतून भाजपला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला, असे बोलले जात आहे.

दरम्यान, मुंबई काँग्रेसने खास ऑनलाइन आणि ऑफलाइन पोस्टर्स तयार केले आहेत. सोशल मीडियावरुन हे पोस्टर वेगाने व्हायरल झाले आहे. तेच आता मुंबईतील रस्त्यांवर फलकातून दिसून येत आहे. यामध्ये मोदी आणि राहुल यांच्या गळाभेटीच्या फोटोसह मोठ्या अक्षरांमध्ये ‘नफरत से नही, प्यार से जितेंगे’ असे लिहीण्यात आले आहे.