Desh

राहुल गांधी कोकेनचे सेवन करतात; त्यांची डोप टेस्ट करा- सुब्रमण्यम स्वामी

By PCB Author

July 06, 2018

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – राहुल गांधींची डोप टेस्ट घेतल्यास ते नक्कीच या टेस्टमध्ये अपयशी ठरतील. कारण ते अमली पदार्थांचे सेवन करतात. विशेषत: कोकेनचे ते सेवन करतात, असा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी  वृत्तसंस्थेशी बोलताना केला.

तत्पूर्वी अमरिंदर सिंग यांच्या या निर्णयावर अकाली दलाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी टीका केली. डोप टेस्ट व्हायला हवी. पण त्यापूर्वी त्या नेत्यांचीही टेस्ट व्हायला हवी ज्यांनी पंजाबच्या ७० टक्के लोकांना नशेच्या आहारी नेले होते, असा टोला हरसिमरत कौर बादल यांनी लगावला होता. त्यांचा हा धागा पकडूनच स्वामी यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले.

हरसिमरत कौर यांनी ७० टक्के पंजाबींना नशेखोर म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल केला होता. यामध्ये राहुल गांधींचाही समावेश असल्याचे स्वामी म्हणाले. राहुल गांधींची वक्तव्ये पाहता तुम्हाला अंदाज लावता येऊ शकतो की ते शुद्धीवर कधीच नसतात. ते नशेच्या आहारी गेले आहेत, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, अमरिंदर सिंग यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांना नियुक्तीपूर्वी डोपिंग टेस्ट अनिवार्य करण्याचा आदेश दिला. या आदेशानुसार सरकारी सेवेत नियुक्तीच्या प्रत्येक स्तरावर ही टेस्ट होणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत. लवकरच याप्रकरणी अधिसूचना जारी करेल असे सांगण्यात येते. विशेष म्हणजे नियुक्तीनंतरही पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची सेवेच्या प्रत्येक टप्प्यात डोपिंग टेस्ट होईल.