Desh

राहुल गांधी ‘आचरट राजकुमार’; अरुण जेटलींची टीका  

By PCB Author

September 20, 2018

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – राफेल करार आणि बँकांच्या थकित कर्जाच्या प्रमाणाबाबत (एनपीए) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सतत खोटे बोलत आहेत. राहुल हे ‘आचरट राजकुमार’ आहेत, अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्यावर तोफ डागली. एक खोटे बोलायचे आणि ते पुन्हा पुन्हा बोलायचे ही राहुल यांची रणनीती आहे, असेही जेटली म्हणाले.

राफेल प्रकरणी आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांवर राहुल गांधी यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. जेटली यांनी एका विस्तृत फेसबुक पोस्टद्वारे राफेल आणि एनपीएप्रकरणी राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले आहे. आपल्या पोस्टमध्ये जेटली म्हणतात, ‘राहुल गांधी दोन खोट्या गोष्टी सांगत आहेत. एक म्हणजे राफेल करार आणि दुसरे म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी १५ उद्योगपतींचे अडीच लाख कोटींचे कर्ज माफ करण्याविषयी.

या दोन्ही आरोपांमधील राहुल गांधींचा प्रत्येक शब्द असत्य आहे. राहुल गांधी उद्योगपतींच्या ज्या कर्जाबाबत बोलत आहेत, ती कर्जे २०१४ पूर्वी देण्यात आलेली आहेत, असे जेटलींनी म्हटले आहे. यूपीए सरकार सत्तेवरून गेल्यानंतर एनपीए २.५ लाख कोटी इतके होते, असेही जेटली यांनी सांगितले.