राहुल गांधींनी पुन्हा मोदींना केला तोच सवाल

0
241

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – चीनने भारताची जमीन घेतली असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टपणे याची कबुली द्यावी. आपल्याला चीनसोबत एकत्र लढायचं आहे. आपण एकत्र त्यांना आपल्या जमीनीवरुन हकलवून लावू फक्त तुम्ही खरं काय ते सांगा, असं आवाहन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना केलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विटवर एक व्हिडिओ पोस्ट करत ही मागणी केली आहे. घाबरण्याचं कोणताही कारण नसून खरं काय ते पंतप्रधानांनी देशाच्या जनतेला सांगावं. देशातील सर्व जनता, लष्कर आणि आम्हीही तुमच्या बाजूने आहोत असं राहुल गांधींनी या व्हिडिओत म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटरवर ‘प्रधानमंत्री जी, देश आपसे सच सुनना चाहता है।’ असा कॅप्शनसहीत एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या कॅप्शनमध्ये #SpeakUpForOurJawans हा हॅशटॅग वापरुन शहीद जवांनांसाठी मोदींनी बोललं पाहिजे असं सांगण्यात आलं आहे. “भारताच्या वीर शहीदांना माझे अभिवादन. संपूर्ण देश एकत्र येऊन, एकात्मतेने आपल्या भारतीय सेनेबरोबर आणि सरकारबरोबर उभा आहे. मात्र यामध्ये एक खूप महत्वाचा प्रश्न समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं की भारताची एक इंच जमीनीही कोणी घेतलेली नाही. कोणीही भारताच्या हद्दीत आलं नाही. मात्र लोकं बोलतायत त्याप्रमाणे, उपग्रहांनी काढलेल्या फोटोंमध्ये दिसतयं, लडाखमधील जनता सांगतेय इतकचं काय लष्कारातील निवृत्त जनरलही सांगत आहेत की चीनने आपला भूभाग ताब्यात घेतला आहे. एका जागी नाही तर तीन जागी चीनने आपला भूभाग बळकावला आहे. पंतप्रधनजी तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. पण देशाला खरं सांगावं लागेल. तुम्हा खरं बोलावं लागेल. जर तुम्ही म्हणालात की जमीन घेतली नाही आणि जमीन घेतली असेल तर चीनचा फायदा होईल. आपल्याला यांच्याविरोधात एकत्र लढायचं आहे. त्यांना बाहेर हकलवून लावायचं आहे. त्यामुळे न घाबरता तुम्ही बोलावं. जमीन घेतली असेल तर सांगा की हो चीनने जमीन घेतली आहे आणि आम्ही कारवाई करणार आहोत. संपूर्ण देश तुमच्या मागे उभा आहे,” असं राहुल यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. तसेच व्हिडिओच्या शेवटी राहुल गांधींनी, “शेवटचा प्रश्न असा आहे की आपले हे जे शहीद सैनिक आहेत त्यांना हत्यारांशिवाय काय पाठवण्यात आलं आणि कोणी पाठवलं?,” असा प्रश्नही सरकारला विचारला आहे.

भारतीय लष्कर आणि चिनी लष्करातील सैनिकांमध्ये १५ जून रोजी पूर्व लडाखमधील गलवानच्या खोऱ्यात संघर्ष झाला. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४३ जवान ठार तसेच जखमी झाले. मात्र भारत चीनदरम्यानच्याया संघर्षानंतर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसने भारत चीन सीमेवर काय सुरु आहे हे जनतेला सरकारने स्पष्टपणे सांगावे अशी मागणी केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणीही भारतामध्ये घुसखोरी केलेली नाही असं वक्तव्य केलं होतं.