राहुल गांधींनी आदेश दिला तरच मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद स्विकारेन- देवरा

0
499

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – सध्या काँग्रेसमध्ये संजय निरुपम यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवण्याच्या मागणीने जोर धरला आहे. निरुपम यांच्याऐवजी माजी खासदार मिलिंद देवरा यांना मुंबईचे अध्यक्ष करण्याच्या मागणीने जोर धरलेला असतानाच देवरा यांनीही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आदेश दिला तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निरुपम राहतात की जातात? याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे.

मिलिंद देवरा यांनी ही इच्छा बोलून दाखवली. ‘सध्या मी काँग्रेस पक्षात विविध पातळ्यांवर काम करत आहे. माझ्या मतदार संघातही लक्ष ठेवून आहे. पण जोपर्यंत राहुल गांधी मला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यायला सांगत नाहीत, तोपर्यंत मी मला सोपवलेली जबाबदारी आनंदानं पार पाडेन’, असे सांगून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे संकेतच देवरा यांनी दिले आहेत. भाजप, शिवसेना आणि मनसेला पर्याय देण्यासाठी काँग्रेसने मुंबईत सक्षमपणे उभे राह्यला हवे. २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सुमार कामगिरी झाली होती. २०१७ च्या महापालिका निवडणुकीतही चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे मुंबईत काँग्रेसला सक्षम चेहरा देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.