राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला राहुल गांधींना आमंत्रण ?

0
1012

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या कार्यक्रमासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आमंत्रण देणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. याआधी माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनीही संघाच्या नागपुरातील कार्यक्रमाला हजेरी लावल्याने मुखर्जी यांच्या मुलीसह काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी नाराजी दर्शवली होती. त्यामुळे राहुल गांधी या कार्यक्रमाला हजेरी लावणार का? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली आहे.

दिल्लीतील विज्ञान भवनात १७ ते १९ सप्टेंबर दरम्यान सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. ‘भारताचे भविष्य : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टिकोन’ या विषयावर मोहन भागवत बोलणार आहेत. या कार्यक्रमासाठी राहुल गांधींना आमंत्रण देणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर माकप नेते सीताराम येचुरी यांनाही संघाकडून आमंत्रण देण्यात येणार असल्याचे समजते.

दरम्यान, दुसरीकडे राहुल गांधींनी आरएसएसची तुलना मुस्लीम ब्रदरहूडशी केल्याने नाव वाद सुरु झाला आहे. तर दुसरीकडे संघाच्या कार्यक्रमाला त्यांना आमंत्रण देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता राहुल गांधी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.