राष्ट्रीय युवादिनानिमीत्त ऑनलाईन “युवा संवाद” कार्यक्रमाचे आयोजन…

0
245

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) : राष्ट्रीय युवादिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी व प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन “युवा संवाद” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये, विविध प्रश्नांद्वारे युवकांनी यशाचे गमक उकलण्यासाठी मान्यवरांशी संवाद साधला. त्याचबरोबर अपयशाला सामोरे कसे जावे, यावर चर्चा देखील पार पडल्या.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता लावणी सम्राट किरण कोरे, राष्ट्रीय पुरस्कार विजेती अंकिता नगरकर, कोर्फबॉल, नेटबॉल, हँडबॉल ऑल इंडिया सिल्वर पदक विजेता विशाखा पालांडे, रोल बॉल स्पर्धेत आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता शुभम शेवटे या युवकांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे तर उपप्राचार्य डॉ. बी.जी. लोबो, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. ज्ञानेश्वर चिमटे आदी उपस्थित होते.
कु. अंकिता नगरकर हिने पेटंट कशा पद्धतीने मिळवले याबद्दल सविस्तर माहिती दिली. कुमार किरण कोरे यांनी आपल्या कलाविष्काराबद्दल संवाद साधला. तसेच युवकांनी आपल्या आवडीचे काम आणि त्यातच करिअर करावे, असा सल्ला दिला. विशाखा पालांडे हिने मुलींनी कोणत्याही क्षेत्रांमध्ये मागे राहू नये, असे मत व्यक्त केले. तर शुभम शेवते यांनी युवकांनी अपयश आल्यानंतर खचून न जाता त्याला सामोरे जावे, असे सांगितले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. रामदास लाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम संयोजनास पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे प्रतिनिधी अक्षय बर्गे, सकाळ इनचे जिल्हाध्यक्ष चेतन लीमन यांचे सहकार्य लाभले.