Sports

राष्ट्रीय कबड्डी : महाराष्ट्राच विजयी सलामी

By PCB Author

April 14, 2021

अयोध्या, दि.१४ (पीसीबी) : प्रभु श्रीरामचंद्राच्या पवित्र भूमीत महाराष्ट्राने करोनाच्या संकटाला दूर ठेवत ६८व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय स्पर्धेत विजयाची पहिली गुढी उभारली. धारदार आक्रमण आणि भक्कम बचाव असा चौफेर खेळ करत महाराष्ट्राने ह गटातील आपल्या पहिल्या सामन्यात मणिपूरचा ४९-३० असा पराभव केला.

येथील डॉ. भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात आजपासून या स्पर्धेला सुरवात झाली. स्पर्धेतील बहुतेक तुल्यबळ संघांनी आपले पहिले सामने सहज जिंकले. महाराष्ट्रही त्याला अपवाद ठरले नाहीत. पहिल्याच सत्रात दोन लोण देत त्यांनी आक्रमक सुरवात केली होती. मात्र, उत्तरार्धात महाराष्ट्राने सामना संथ केला. पहिलाच सामना आणि प्रतिस्पर्धी कमकुवत असल्यामुळे हे नियोजन कामी आले. यानंतरही वर्चस्व राखले की ते अखेरपर्यंत कायम ठेवायचे याचा धडा महाराष्ट्राला नक्कीच मिळाला असेल.

विश्रांतीला महाराष्ट्राने ३१-१६ अशी मोठी आघाडी घेतली होती. अंतिम गुणफलक बघितला, तर विजयाधिक्य वाढणे अपेक्षित होते. पण, महाराष्ट्राचा विजय १९ गुणांवर मर्यादित राहिला. उत्तरार्धात मणिपूर संघाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. एकवेळ त्यांनी महाराष्ट्राला लोणच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते. पण, शिलकी दोन खेळाडूत सुपर टॅकल करून महाराष्ट्राने लोण नुसताच फिरवला नाही, तर त्यानंतर मणिपूरवर तिसरा लोण देत आपला विजय निश्चित केला.

महाराष्ट्राला अजिंक्य पवार आणि पंकज मोहिते यांच्या चढाया नक्कीच निर्णायक ठरल्या. बचावामध्ये शुभम शिंदे आणि गिरीश इरनाक यांनी आपली कामगिरी चोख बजावली. चढाई आणि बचाव यातील समन्वय सुरेख राहिल्यामुळे महाराष्ट्राचा विजय सुकर झाला. तिसरा लोण चढवताना गिरीशने केलेल्या पकडी महत्वाच्या ठरल्या.