“राष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये आहे आणि तो…” ; राऊतांच लक्षवेधी ट्विट

0
296

मुंबई, दि.२७ (पीसीबी) : शिवसेना नेते संजय राऊत यांनी लक्षवेधी ट्विट करत ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. तो दिवस लवकरच उगवेल’, असं म्हणत साऱ्यांचं लक्ष खेचून घेतलं आहे. राऊत यांच्या या ट्विटमुळे उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अखंड साथ. अतूट नाते. राष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे. तो दिवस लवकरच उगवेल. आपणास वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!,’ असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राऊत यांनी या ट्विटबरोबर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यावर आणि त्यानंतरचे काही क्षणचित्रं दाखवण्यात आले आहेत. त्यात राऊतांचं भाष्यही आहे. आता कोणी… आता कोणी इंद्राचं आसन जरी आम्हाला दिलं तरी आम्हाला नको. देश की जनता देखेगी महाराष्ट्र के मुख्यमंत्रीपदपर शिवसेना का एक शिवसैनिक विराजमान होगा, असं भाष्य राऊत करताना दिसत आहे. दरम्यान, राऊत यांनी सकाळीच मीडियाशी संवाद साधून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकाला आपला कुटुंब प्रमुख वाटतात. हे त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे. घरातला माणूस नेतृत्व करतो, असं प्रत्येकाला वाटतं. हे नेतृत्व प्रदीर्घ काळ टिकेल. राष्ट्रालाही त्यांच्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वावादी नेतृत्वाची गरज आहे. ते देशाला नेतृत्व देतील, अशा शुभेच्छा मी त्यांना देतो, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजवरचा प्रवास, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेंनी सांभाळलेली शिवसेना, पेललेली आव्हानं याचा धांडोळा या लेखात घेण्यात आला आहे. दक्षिण आणि उत्तरेतील राज्यांतील जनतेला आपलेसे वाटू शकेल असे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांचे असल्याने, ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे तमाम मराठी जनतेचं स्वप्न साकार करावं. त्यांनी भविष्यात पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घ्यावीत, असं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.