राष्ट्रवादी व शिवसेनेच्या गुंड नगरसेवकांवर कडक कायदेशीर कारवाई करा – महापौर, उपमहापौरांसह पदाधिकाऱ्यांची पोलिस आयुक्तांकडे मागणी, विलास मडिगेरी यांना झालेल्या मारहाणीचा निषेध

0
486

पिंपरी, दि. २ (पसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडिगेरी यांना झालेल्या मारहाणीचा भाजपाने निषेध केला आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेच्या गुंड नगरसेवकांवर कडक कायदेशीर कारवाई आणि त्यांच्या दादागिरीचा बिमोड करण्याची मागणी पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडे करण्यात आली. महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी पोलीस आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यात सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मंत्री, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून दादागिरी आणि गुंडगिरी वाढल्याचे वेळोवेळी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका तरूण अभियंत्याला आपल्या बंगल्यावर बोलावून मारहाण केली. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाने नगर परिषदेच्या मुख्याधिकारी महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली. पिंपरी-चिंचवडमध्येही राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गुंड पदाधिकाऱ्यांकडून सर्वसामान्यांना त्रास होत आहे. आता तर या दोन्ही पक्षाच्या गुंड नगरसेवकांनी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विलास मडिगेरी यांना मारहाण करण्यापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये नगरसेवकांनाच अशा प्रकारे मारहाण होत असेल, तर सर्वसामान्य नागरिक सुरक्षित आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विलास मडिगेरी यांना सोमवारी दि. १ जून रोजी महापालिकेत जबर मारहाण करण्यात आली. शिवसेना गटनेते राहुल कलाटे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे या दोघांनी मिळून ही मारहाण केली. एका ज्येष्ठ नगरसेवकाला झालेली ही मारहाण म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गुंड नगरसेवकांची गुंडगिरी किती वाढली आहे हे दर्शवते. अशा प्रकारे एका ज्येष्ठ नगरसेवकाला झालेल्या मारहाणीचा पिंपरी-चिंचवड शहर भाजपकडून निषेध करण्यात येत आहे.
या प्रकरणात आता पोलिसांनी राहुल कलाटे आणि मयूर कलाटे या दोन्ही नगरसेवकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी. शिवसेना गटनेते राहुल कलाटे हे नगरसेवक झाल्यापासून पिंपरी-चिंचवड महापालिकेत वारंवार दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल कलाटे यांनी यापूर्वीही भाजपचे माजी सत्तारूढ पक्षनेते यांना अश्लिल शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला होता. राहुल कलाटे हे महापालिकेतील अधिकाऱ्यांनाही वारंवार शिवीगाळ करून धमकावित असतात. त्याबाबत कोणी पुढे येऊन बोलत नसल्यामुळे राहुल कलाटे यांची दादागिरी आणि गुंडगिरी वाढली आहे. त्यातूनच राहुल कलाटे यांनी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विलास मडिगेरी यांना मारहाण करण्यापर्यंत मजल मारली आहे, असे निवेदनीत म्हटले आहे.

राहुल कलाटे यांनी मागे सुद्धा वाकडमध्ये दहीहंडी कार्यक्रमाच्या वेळी एका पोलिस अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचे सर्वश्रुत आहे. याशिवाय सहा महिन्यापुर्वी महापालिकेच्या एका उपअभियंत्याला देखील शिवीगाळ व मारहाण केलेबाबत त्यांचेवर गुन्हा दाखल आहे, तरीही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. तसेच महापालिका सभेमध्ये महिला महापौरांच्या दिशेने त्यांनी काचेचा ग्लास भिरकवुन फोडण्याचा गैरप्रकार देखील केला आहे. आता राज्यात सत्तेत आल्यामुळे राहुल कलाटे यांच्या दादागिरी आणि गुंडगिरीला ऊत आला आहे. त्याला पोलिसांनी वेळीच आळा घालावा. आता नगरसेवकांवर हल्ला करूनही राज्यातील सत्तेआड लपून राहुल कलाटे आणि मयूर कलाटे यांच्यावर कायदेशीर कारवाई न झाल्यास शहरातील सर्वसामान्यांचा कायद्यावरील विश्वास उडेल. पोलिस प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विलास मडिगेरी यांना मारहाण करणारे शिवसेना गटनेते राहुल कलाटे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांच्यावर कडक कायदेशीर करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे.