राष्ट्रवादी काँग्रेसची शहरात ताकद वाढली आहे, तर दुसरीकडे भाजप सरकार विरोधात नाराजी वाढू लागली आहे. त्यामुळे २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे लोकसभेची निवडणूक लढवली जाणार आहे, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्याचबरोबर खडकवासला विधानसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीचा उमेदवार उभा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

वारजे येथे हल्लाबोल यात्रेनिमित्त शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पवार यांनी भाजप सरकारवर कडाडून हल्ला चढवला. यावेळी  पवार यांनी पुणे लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असल्याचे सांगितले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. त्यावेळी पुण्याची जागा काँग्रेसने लढवली होती. त्या पार्श्र्वभूमीवर पुण्याची जागा लढवण्याची घोषणा केल्यामुळे  चर्चेला सुरूवात झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, खासदार सुप्रिया सुळे, पक्षाच्या शहराध्यक्षा, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.