‘राष्ट्रवादी-काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुक खरंच स्वबळावर लढणार का?’ यावर अजित पवारांनी सोडलं मौन

0
272

मुंबई, दि.०७ (पीसीबी) : काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला. शिवाय शिवसेनेनेदेखील बालेकिल्ला असणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. यामुळे महाविकास आघाडी मुंबई महापालिका एकत्रित लढणार की स्वबळावर अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अजित पवार म्हणाले कि,“राष्ट्रवादीची सध्या तरी मित्रपक्षांसोबत आघाडी करुन पुढं जायचं अशी चर्चा सुरु आहे. अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या वरिष्ठांना आहे. शरद पवार, जयंत पाटील सर्वा चर्चा करुन निर्णय घेतील. पण आमची मानसिकता आघाडी करावी, मतांची विभागणी होऊ नये अशीच आहे. मतांची विभागणी होईन ना मला, ना धड तुला, दे तिसऱ्याला असं होऊ शकतं. मी तरी याबाबतीत सकारात्मक आहे.”

यावर त्यांना विचारण्यात आलं की,’मुंबई महापालिकेसाठी शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं समीकरण जुळू शकतं का ?’ तर त्यावर उत्तर देत ते म्हणाले की, “आधीच अंदाज व्यक्त करणं चुकीचं आहे. आम्ही बाळासाहेब थोरात, भाई जगताप यांच्यासोबत चर्चा करु. महाविकास आघाडीला अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न असेल”.