Desh

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे

By PCB Author

March 22, 2021

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचं दिसत आहे. कारण माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राची चिरफाड करताना, शरद पवारांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी त्यांनी परमबीर सिंगांच्या पत्राचा दाखला दिला. पवार म्हणाले, ज्या कालावधीचा उल्लेख करुन परमबीर सिंगांनी भेटीचा उल्लेख केला, त्या कालावधीत अनिल देशमुख हे कोरोनावरील उपचारासाठी नागपुरातील रुग्णालयात दाखल होते. त्यामुळे परमबीर सिंगांच्या आरोपात काही तथ्य नाही असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत भाष्य केलं.

परमबीर सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले होते. माझ्याकडे कागदपत्र आहेत. त्यावरून 5 ते 15 फेब्रुवारीपर्यंत अनिल देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. मी रुग्णालयातूनही ही माहिती घेतली आहे. देशमुख हॉस्पिटलमध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड आहे आणि 15 ते 27 फेब्रुवारी पर्यंत होम कॉरेन्टाईनचा सल्ला डॉक्टरांचा होता. असं असताना सिंग कशाच्या आधारावर देशमुखांनी वाझेंना भेटून वसुलीचे आदेश दिल्याचं सिंग सांगत आहेत, असा सवाल पवारांनी केला.

शरद पवार यांचे मुद्दे – १) परमबीर सिंग यांचे आरोप खोटे, अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही सिंग यांनी जे आरोप केले आहेत. त्या कालावधीत देशमुख रुग्णालयात होते. त्यामुळे त्यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये आता ताकद राहिली नाही, अनिल देशमुख मुंबईत नव्हते, रुग्णालयात होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही. देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार नाही.

२) परमबीर सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वाझेंना बोलवले होते असे पत्रात नमूद केले आहे. त्यानंतर गृहमंत्री मला आणि मुख्यमंत्र्यांना भेटले असे लिहिलंय. मात्र आमची भेट मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात झाली होती, असं सांगतानाच परमबीर सिंग हे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत गप्प का होते? ते आरोपासाठी महिनाभर का थांबले?

३) अनिल देशमुख यांची चौकशी करणार का? असा सवाल पवारांना करण्यात आला. त्यावर पवारांनी थेट यूटर्न घेतला. आता आलेल्या कागदपत्रावरून देशमुख हे मुंबईत नव्हतेच. ते नागपूरला होते आणि कोरोनावर उपचार घेत होते. त्यामुळे सिंग यांनी केलेले आरोप खोटे असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे चौकशीचा प्रश्नच येत नाही, असं पवार म्हणाले.

४) महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, परमबीर सिंग यांनी जे जे मेन्शन केलं आहे, वाझेप्रकरणात, त्याबद्दल माझं म्हणणं आहे, मुख्य केस कोणती आहे? अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी पार्क करण्याची आहे, असंही त्यांनी सांगितलं. मुख्य केस काय आहे तर संबधीत गोष्टी अंबनीच्या घराखाली गाडीत कशा आल्या, हे माझ्यासाठी महत्वाचे आहे.

५) काल एटीएसने दोघांना अटक केली आहे. हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणात ही अटक झाली आहे. यावरुन एक स्पष्ट होत आहे, हिरेन यांची हत्या का झाली, त्यांची हत्या करणारे जे पोलीस वाटतात, त्यांना एटीएसने अटक केली. आता तपास सत्य बाहेर येईल. उद्या-परवा कधी येईल माहिती नाही. मात्र मला आनंद आहे, मुख्य केस जे सीपींच्या आरोपानंतर दुर्लक्षित होत होती, अंबानीच्या घराबाहेर स्फोटकांची, त्याबाबत चौकशी होत आहे.