राष्ट्रवादी काँग्रेसची मोर्चेबांधनी सुरू

0
307

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – तीन महिन्यावर येऊन ठेपलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपाचा पाडाव करण्याच्या हेतुने राष्ट्रवादी काँग्रेसने आता जोरदार मोर्चेबांधनी सुरू केली आहे. पिंपरी राखईव मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली आज चिंचवड येथील बनसोडे यांच्या कार्यालयात प्रमुख शिलेदारांची एक बैठक पार पडली. राष्ट्रवादीचे बहुतेक प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. कोणत्याही परिस्थितीत आता भाजपाला नेस्तनाबूत करायचे म्हणून या नेत्यांनी गटतट विसरून आता एकजूट केली आहे.

पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीला शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझमभाई पानसरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, माजी महापौर मंगला कदम, नगरसेविका माई काटे,नगरसेवक रोहितआप्पा काटे, माजी नगरसेवक उल्हास शेट्टी, प्रसाद शेट्टी आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील स्थानिक नेत्यांना एकजुटीने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेष्ठ नेते शरद पवार यांनी मेळावा घेऊन कामाला लागा, असे आदेश दिले. त्यानुसार निवडणुकिची मोर्चेबांधणी करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी आज सविस्तर चर्चा केली. भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार, विकासकामांतील ढिसाळपणा आणि शहरात वाढलेले विद्रुपिकरण आदी विविध विषयांवर सत्ताधारी भाजपाला घेरण्याची रणनिती या बैठकीत आखण्यात आली.