Maharashtra

 राष्ट्रवादीला संपवणे, चिक्की खाण्याइतके सोपे नाही; धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला  

By PCB Author

February 24, 2019

बीड, दि. २४ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस संपवणे, हे चिक्की खाण्याइतके सोपे नाही, असा टोला   विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना लगावला.  हिंमत असेल, तर समोरासमोर या कोण संपतंय ते पाहू, असे आव्हानही त्यांनी दिले.  

परळीत झालेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या संयुक्त  जाहीर सभेत मुंडे बोलत होते.

यावेळी मुंडे म्हणाले की,  परळीमध्ये ६ जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवक आमचे आहेत.  तरीही पंकजा मुंडे यांनी आमचे डिपॉझिट जप्त करू असे म्हटले आहे.  मुख्यमंत्री साहेब लक्षात ठेवा मस्तवाल सत्तेचा शेवट परळीत होतो. तुम्हाला परळीबद्दल इतकी अडचण आहे तर तुम्ही सुरुवात परळीपासून का केली?

रायगडासारख्या पवित्र भूमितून का केली नाही? तुमच्या मनात काळे आहे, हे यावरूनच स्पष्ट होते, असेही टीका त्यांनी केली. तसेच तुमच्या सोळा मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत दाखवाल का? असाही प्रश्न  मुंडे यांनी  केला.