राष्ट्रवादीला धक्का; ‘या’ आजी-माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

0
496

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – अवघ्या ७ दिवसांवर विधानसभेचे मतदान आले असताना राष्ट्रवादीतील गळती कायम आहे. राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार रामराव वडकुते आणि पुण्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार बापू पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ऐननिवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

रामराव वडकुते  हिंगोलीमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. परंतु पक्षाने उमेदवारी नाकारल्याने ते नाराज होते. वडकुते यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. त्यामुळेच त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. अखेर त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत कमळ हाती घेतले आहे.

बापू पठारे  पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. तसेच ते अजित पवारंचे निकटवर्तीय मानले जातात.  त्यांच्या भाजपप्रवेशामुळे भाजप उमेदवार आणि विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांना मोठे बळ मिळणार आहे. तर राष्ट्रवादीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.  पठारे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.