राष्ट्रवादीला आणखी एक दणका; माजी मंत्री दिलीप सोपल शिवसेनेत जाणार

0
414

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्‍वासू मानले जाणारे सोलापूरचे विद्यामान आमदार तथा माजी मंत्री दिलीप सोपल हे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

बुधवारी रात्री दिलीप सोपल हे मुंबई येथे मातोश्रीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये शिवसेना प्रवेश आणि विधानसभेचे तिकीट यासह अनेक बाबींवर चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सोपल शिवसेनेत जाणार अशी चर्चा होती. आता त्याच्या प्रवेशाने शनिवारी याला पूर्णविराम मिळणार आहे. सध्या सोपल यांच्या कार्यकर्त्यांकडून “१० तारीख, जय महाराष्ट्र ….” अश्या आशयाच्या पोस्ट सध्या फेसबुक वरती फिरत आहेत.

सोपल यांच्या सेना प्रवेशाने भाजपचे नेते माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्यासाठी देखील हा मोठा धक्का असणार आहे. कारण शिवसेना – भाजप युतीच्या जागा वाटपात बार्शीची जागा ही सेनेकडे आहे. सध्या विद्यमान आमदार हे दिलीप सोपल असल्याने या ठिकाणी विधानसभेची जागा शिवसेनेलाच सुटणार असल्याचे सांगण्यात येत आहे.