राष्ट्रवादीने बुलढाण्याची जागा न सोडल्याने स्वाभिमानी नाराज

0
571

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांशी आघाडी करणार होती, कोणत्याही एका पक्षाशी नाही. त्यामुळे आम्ही मागणी करत असलेल्या बुलढाणा लोकसभेसाठी उमेदवार जाहीर करण्याआधी राष्ट्रवादीने चर्चा करायला हवी होती, अशी नाराजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी   व्यक्त केली आहे.

आघाडीकडे खासदार  राजू शेट्टी यांनी हातकणंगले, बुलढाणा आणि वर्धा मतदारसंघाची मागणी केली आहे. आज (गुरूवार) राष्ट्रवादीने पहिली यादी जाहीर केली. यात  हातकणंगलेची जागा शेट्टी यांच्यासाठी सोडण्यात आली आहे. मात्र, बुलढाण्याची जागी सोडलेली नाही. यावर तुपकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादीने बुलढाण्याच्या जागेवर राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे बुलढाण्यातून इच्छुक असणारे रविकांत तुपकर यांना डावलल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे स्वाभिमानीचे नेते खासदार  राजू शेट्टी आता कोणती भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.