Maharashtra

राष्ट्रवादीने नगर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला दिले; शरद पवार यांची घोषणा

By PCB Author

March 01, 2019

अकलूज, दि. १ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली लोकसभेची अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (दि. १) केली आहे. अकलूज येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. त्यामुळे दीर्घकाळ सुरू असलेला या जागेचा तिढा आता सुटला आहे. काँग्रेसकडून या जागेसाठी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे प्रबळ दावेदार आहेत.

नगर लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे तर शिर्डीची काँग्रेसकडे आहे. डॉ. विखे यांनी नगरसाठी गेल्या दोन अडीच वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. त्यामु‌ळे राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला सोडावी, अशी मागणी होत होती. जागा वाटपाच्या बैठकांमधून यावर चर्चा होत असताना राष्ट्रीय निवड समितीपर्यंत राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेतेही या जागेवर ठाम होते. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीकडून या जागेसाठी अनेक उमेदवारांची नावेही पुढे आणली जात होती. शेवटी काँग्रेसच्या अनुराधा नागवडे यांना पक्षात घेऊन त्यांना येथून राष्ट्रवादीची उमेदवारी देण्याचे ठरले होते. मात्र, ऐनवेळी त्यांचा प्रवेशच रद्द करण्यात आला.

त्यानंतर शुक्रवारी पवार यांनी ही जागा काँग्रेसला सोडल्याची घोषणा केली आहे. ही जागा काँग्रेसला सोडावी यासाठी विखे यांच्याकडून विविध प्रयत्न सुरू होते. भाजपसह अन्य पक्षांत जाण्याची तयारी दर्शवत दबाव टाकण्याचाही प्रयत्न झाला, तर पवार ऐकत नाहीत हे पाहून विखे यांनी पवार आपल्याला पितृतूल्य असल्याचे सांगत त्यांनी नातवासाठी जागा सोडावी, असे साकडेही घातले होते.

या जागेवरून भाजपचा उमेदवार तीन वेळा विजयी झालेला आहे. राष्ट्रवादीचा सतत पराभव झाला आहे. मात्र, मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जास्त मते असल्याचे सांगत ही जागा सोडण्यास नकार दिला जात होता. विखे यांच्याकडून सुरू असलेले विविध प्रयत्न आणि सध्या अचानक बदललेले देशातील वातावरण या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून ही जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय झाला आहे.