राष्ट्रवादीत नव्या तरूण चेहऱ्यांना संधी मिळणार; शरद पवार यांची भूमिका

0
629

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षामध्ये मोठी उलथापालथ करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत तरुण नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत अंतर्गत मोठी फेररचना होण्याची शक्यता बळावली आहे. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याआधी पक्षातील नकारात्म बाबी दूर करण्यासाठी पवार पावले उचलणार आहेत. त्यासाठी पहिले पाऊल म्हणून विधानसभेत जास्तीत जास्त तरुणांना तिकीट देण्याच्या तयारीत राष्ट्रवादी काँग्रेस आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसपेक्षा चांगली कामगिरी केली असली, तरी 48 जागांचा विचार करता राष्ट्रवादीला मोठ्या पराभवाला सामोर जावे लागले आहे. राष्ट्रवादीला लोकसभेच्या निवडणुकीत फक्त 4 जागा मिळाल्या. राष्ट्रवादीने लढवलेल्या जागेंच्या तुलनेत जिंकलेल्या जागा निम्याहून कमी आहेत. त्यामुळे विधानसभेच्या दृष्टीने राष्ट्रवादीला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. त्यामुळे आता शरद पवार काय बदल करतात आणि पक्षातील तरुणांना किती प्रमाणात संधी मिळेल, हे पाहणे महत्त्वाचे आहे.