Pune Gramin

राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंना मिळणार प्रतिसाद पाहून विरोधकांना भरली धडकी !

By PCB Author

October 10, 2019

तळेगाव, दि. १० ( पीसीबी) – मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांनी सुरु केलेल्या प्रचारकार्यात गावा-गावातून त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधकांना धडकी भरली. शेळके यांच्या झंझावाती दौऱ्याने मावळ तालुका ढवळून निघाला आहे. 

गेल्या आठवड्यात मावळ तालुक्यात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. भारतीय जनता पक्षाकडून सुनील शेळके यांना उमेदवारी हवी होती. गेल्या अनेक महिन्यांपासून शेळके यांनी त्यादृष्टीने तयारी सुरु केली होती. मात्र, भाजपकडून पुन्हा विद्यमान आमदार बाळा भेगडे यांनाच उमेदवारी जाहीर झाली. यानंतर नाराज शेळकेंना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच शेळके यांनी भेगडेच्या विरोधात दंड थोपटले. त्यांनी तात्काळ तालुक्याच्या प्रचाराचा धडाका लावला. मावळ तालुक्यातील गावा-गावातून, वाड्या-वस्त्यांतून शेळके यांना नागरिकांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून विरोधक गारठले. त्यामुळे यंदा मावळच्या राजकीय इतिहासात मोठे बदल होणार असल्याची चर्चा सुरु आहे.

सुनील शेळके यांनी नगरसेवक असतानाही मावळ तालुक्यात मोठी विकासकामे केली आहेत. मूळचा समाजकारणाचा पिंड असल्यामुळे त्यांनी समाजाच्या विकासालाच नेहमी प्राधान्य दिले. तळागाळातील कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी काम केलेले आहे. त्यामुळेच नागरिकांचा त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड विश्वास आहे. विकासकामांसाठी स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करणारे शेळके एकमेवच असावेत. मावळ तालुक्यातील १५० पैकी ११८ गावांमध्ये शेळके यांनी स्वनिधी वापरून आणि लोकांच्या सहभागाने विविध विकासकामे केली, हे विशेष ! विध्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, परीक्षा काळात मावळच्या दुर्गम भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची घरापासून परीक्षा केंद्रापर्यंत मोफत व्यवस्था, कचऱ्याच्या योग्य विल्हेवाटीसाठी अत्याधुनिक प्रकल्पाची उभारणी, महिलांना मोफत शिवणकला आणि फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण, ज्येष्ठ नागरिक महासंघाची स्थापना, तळेगाव स्टेशन चौकात स्वखर्चाने रस्ता दुभाजकाची उभारणी, १५ वर्षांपासून प्रलंबित पाणीप्रश्नाची १० महिन्यात सोडवणूक अशा प्रमुख कार्यामुळे सुनील शेळके यांची लोकप्रियता वाढू लागली. त्यामुळेच यंदा मावळचा कारभारी बदलायलाच हवा, अशी आग्रही मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे. सुनील शेळके यांनी पक्ष बदलला असला तरी समाजसेवेची तळमळ, मावळ तालुक्याच्या विकासाचा ध्यास तोच आहे. त्यामुळेच त्यांच्या लोकप्रियतेत काहीही फरक पडला नाही. म्हणूनच शेळके यांनी सुरु केलेल्या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यामुळे विरोधकांची झोप उडाली आहे, हे मात्र निश्चित !