Maharashtra

राष्ट्रवादीच्या विद्यमान पाच खासदारांची पुन्हा उमेदवारी निश्चित !

By PCB Author

January 23, 2019

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाचही विद्यमान खासदारांना पुन्हा लोकसभा निवडणुकांचे तिकीट  देण्यात येणार आहे. खासदार उदयनराजे, सुप्रिया सुळे, धनंजय महाडिक, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर कुकडे या पाचही विद्यमान खासदारांची पक्षाने आगामी लोकसभा  लढवण्यासाठी उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे त्यांचा  मार्ग मोकळा झाला आहे. 

माढा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील विद्यमान खासदार आहेत. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख  या जागेवर निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र,  विजयसिंह मोहिते पाटील यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबत पक्षातूनच नाराजीचा सूर  आहे.  मात्र उदयनराजेंच्या  उमेदवारीवर पक्षनेतृत्व ठाम असल्याचे सांगितले जात आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत मधुकर कुकडे विजयी झाले होते.   त्यानंतर त्यांना  यंदाही  उमेदवारी मिळणार असल्याची माहिती आहे.  दुसरीकडे, बारामतीमधून सुप्रिया सुळे आणि कोल्हापूरमधून धनंजय महाडिक  यांची उमेदवारी आधीच निश्चित करण्यात आली आहे.  त्यामुळे राष्ट्रवादीचे पाचही खासदार  पुन्हा आपले वर्चस्व राखणार  का?, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.