राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराला हनी ट्रॅपमध्ये ओढण्याचा प्रयत्न

0
374

खेड, दि. २४ (पीसीबी) : खेड-आळंदी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना बदनाम करण्यासाठी ‘हनी ट्रॅप’ रचणाऱ्या तिघांविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात काल (शुक्रवारी) रात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शैलेश शिवाजी मोहिते-पाटील (रा. सांगवी, जि.पुणे), राहूल किसन कांडगे (रा. चाकण, जि.पुणे), सोमनाथ दिलीप शेडगे (रा. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी आमदारांचे पुतणे मयुर साहेबराव मोहिते-पाटील यांनी फिर्याद दिली आहे. शैलेश शिवाजी मोहिते-पाटील आणि राहूल किसन कांडगे यांनी साताऱ्यातील एका युवतीच्या माध्यमातून आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये ओढत बदनामी करण्याची भिती दाखवून त्यांच्याकडून लाखो रूपये उकळण्याचा डाव आखला होता. त्या बदल्यात त्या युवतीला एक लाख रुपये संशयितांनी दिले होते. मात्र, त्या युवतीनेच याची माहिती आमदारांच्या पुतण्यास फोन करून दिली. यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित युवतीकडे चौकशी केली असता, हा सगळा प्रकार समोर आला. त्या युवतीने पोलिसांना सांगितले की, शैलेश मोहिते व राहुल कांडगे हे दोघे 12 एप्रिल रोजी साताऱ्यातील फ्लॅटवर भेटण्यासाठी आले होते.

त्यांनी आपल्याला आमदार मोहिते पाटील यांची बदनामी करायची असून त्यासाठी तुझी मदत पाहिजे असल्याचे सांगितले. तू पुतण्याच्या माध्यमातून आमदार यांच्याकडे नोकरी माग व घसट वाढव. आमदारांना प्रेमाच्या जाळ्यात ओढ, नंतर आपण त्यांना बदनामीची भीती तसेच पोलिस केसची भिती दाखवू,. यामुळे ते आपल्याला भरपूर पैसे देतील. त्याबद्‌ल्यात तुला जास्त पैसे आणि पुण्यात फ्लॅट घेऊन देतो. आम्ही तिघांनी पूर्ण प्लॅन केला असून तू फक्त त्यात सहभागी हो, असे सांगितल्याची माहिती पोलिसांना दिली. त्या तिघांनी त्या बदल्यात सदर मुलीला वेळोवेळी एकूण एक लाख चार हजार रूपये दिले होते. मात्र, मनाला न पटल्याने त्या युवतीने आमदारांचा पुतण्या मयुर यांना फोन करून सदर प्लॅन सांगितला. यानुसार मयूर यांनी रात्री सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली. या तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक झालेली नसून अधिक तपास पोलिस निरीक्षक सजन हंकारे करत आहेत.