Pune Gramin

राष्ट्रवादीच्या भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी सूसमधील सुनील चांदेरे यांची निवड

By PCB Author

October 23, 2018

मुळशी, दि. २३ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी मुळशी तालुक्यातील सूस येथील सुनील चांदेरे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी चांदेरे यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सुनील चांदेरे पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून जिल्ह्यात ओळख आहे. उत्तम संघटन कौशल्याबरोबर अभ्यासू व मैदानी वक्ते म्हणून त्यांची ख्याती आहे. चांदेरे गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशी तालुका अध्यक्ष होते. भाजप-शिवसेना युती सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात चांदेरे यांनी जिल्ह्यात सर्वाधिक आंदोलने केली आहेत. त्यांनी मुळशी तालुक्यात पक्षवाढीसाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत पक्षाने त्यांची भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी चांदेरे यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. यावेळी त्यांचे बंधू रुपेश चांदेरे उपस्थित होते.

सुनील चांदेरे यांनी २००२ ते २००७ अशी पाच वर्षे सूस गावचे सरपंचपद सांभाळले आहे. सूसगावच्या विकास सोसायटीचे ते अनेक वर्षे संचालक आहेत. १९९९ ते २००७ पर्यंत त्यांनी पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. २००७ ते २००९ महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ते उपाध्यक्ष होते. २००९ ते २०१२ या कालावधीत ते पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस होते. २०१२ ते २०१५ या कालावधीत चांदेरे यांनी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून काम केले आहे. २०१२ च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाचे समन्वयक व प्रचारप्रमुख म्हणून अतिशय प्रभावीपणे त्यांनी काम केले. २०१४ च्या पुणे विभाग पदवीधर विधानपरिषद निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्राचे निरीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

२०१५ ते २०१८ या कालावधीत मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. २०१७ च्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत चांदेरेंच्या नेतृत्वाखाली पक्षाने विजय मिळवला. आज दोन्ही संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. राजकारणाबरोबर साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रातही चांदेरे यांचे काम आहे. सध्या पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मुळशी साहित्य परिषदेचे काम चालू आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच पक्षाने चांदेरे यांची भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी निवड केली आहे