Maharashtra

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात अपहरणाचा गुन्हा

By PCB Author

December 04, 2018

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मुनावर पटेल यांच्याविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात अपहरण आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हे माझ्या विरोधातील राजकीय षडयंत्र असून लोकप्रियता वाढत असल्याने हे कारस्थान रचण्यात आले आहे, असा दावा मुनावर पटेल यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुनावर पटेल हे नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक ५५ चे नगरसेवक आहेत. शुक्रवार (दि.२) नोव्हेंबर खैरणे गावात सुफियना शेख या रिक्षाचालकाची पटेल यांच्या कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची झाली होती. यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करत पटेल यांच्या कार्यालयात नेले आणि तिथेही मला मारहाण करण्यात आली, असे रिक्षाचालकाने म्हटले आहे. रिक्षाचालकाने या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला होता. शेवटी त्यांनी या प्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली.पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर कोपरखैरणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, नगरसेवक मुनावर पटेल यांनी माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र असल्याचे सांगत चांगल्या कामाने मिळणारी लोकप्रियतेमुळे हे कारस्थान रचण्यात आल्याचा दावा केला आहे.