Maharashtra

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची संपत्ती पाच वर्षांत ५१ कोटींवरून ११३ कोटी

By PCB Author

March 19, 2019

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आलेल्या १५३ खासदारांच्या संपत्तीत १४२ टक्क्यांची वाढ झाली आहे. या खासदारांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा पहिल्या, तर बिजू जनता दलाच्या पिनाकी मिश्रा या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. इलेक्शन वॉच आणि असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेच्या पाहणीनुसार २००९ ते २०१४ या गेल्या पाच वर्षांमध्ये १५३ खासदारांच्या संपत्तीत सरासरी ७ कोटी ८१ लाखांची वाढ झाली आहे. यात शत्रुघ्न सिन्हा यांची संपत्ती सर्वात जलद गतीने वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांची २००९ मध्ये सुमारे १५ कोटी रुपयांची सपत्ती होती. २०१४ मध्ये त्या संपत्तीत वाढ होऊन ती १३१ कोटी रुपयांवर गेली. बीजू जनता दलाच्या (बीजेडी) पिनाकी मिश्रा यांची यांची संपत्ती १०७ कोटींची होती. त्यात वाढ होत ती १३७ कोटींवर पोहोचली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा क्रमांक तिसरा लागतो. ५१ कोटींच्या त्यांच्या संपत्तीत वाढ होऊन २०१४ मध्ये ती ११३ कोटींवर पोहोचली आहे.

पुन्हा निवडून आलेल्या या खासदारांची २००९मध्ये सरासरी संपत्ती होती ५.५० कोटी इतकी. यात दुपटीने वाढ होऊन ती सरासरी १३.३२ कोटी इतकी झाली. संपत्तीत सर्वाधिक वाढ होणाऱ्या पहिल्या दहा खासदारांमध्ये अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल सहाव्या स्थानी, तर वरुण गांधी १० व्या स्थानी आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या २००९ मध्ये असलेल्या २ कोटीच्या संपत्तीत वाढ होऊन २०१४ मध्ये ती ७ कोटी इतकी झाली आहे.