Pune

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतला मावळ तालुक्याचा आढावा; सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन

By PCB Author

April 25, 2020

– आमदार सुनील शेळके यांच्या विविध उपक्रमांचे कौतूक

– तालुका प्रशासनाच्या उपाययोजनांवर व्यक्त केले समाधान

वडगाव मावळ, दि.२५ ( प्रतिनिधी ) कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ मुंबई आणि पुणे-पिंपरी-चिंचवडच्या हद्दीलगत असलेल्या मावळ तालुक्यातील सध्यस्थितीबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी आढावा घेतला. आमदार सुनील शेळके यांना फोनद्वारे संपर्क साधून सर्व माहिती जाणून घेतली. तसेच, आवश्यक सूचनाही केल्या आहेत. राज्य शासन कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी निकराचा लढा देत आहे. तरीही, शरद पवार प्रत्येक आमदारांना स्वत: फोन करुन मतदार संघातील इत्यंभूत आढावा घेत आहेत. शनिवारी मावळचे आमदार शेळके यांना पवार यांनी फोन करुन विचारपूस केली. विशेष म्हणजे, लोकप्रतिनिधी आणि प्रशाससनाने सकारात्मक समन्वय ठेवून प्रभावीपणे उपायोजना केल्यामुळे कोरोनाला शिरकाव करु दिला नाही. याबाबत पवार यांनी प्रशासनाच्या कामगिरीवर समाधानही व्यक्त केले आहे. सध्या तालुक्यातील परिस्थिती काय आहे? कष्टकरी-चाकरमानी नागरिकांना योग्य ती मदत होत आहे का? अत्यावश्यक सेवा-सुविधा व्यवस्थित सुरू आहेत का? तुम्ही कोण-कोणते उपक्रम हाती घेतले आहेत. प्रशासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य होत आहे का? तुम्हाला राज्य सरकारकडून कोणती मदत अपेक्षीत आहे? तुम्ही प्रतिनिधीत्व करीत असलेल्या मतदार संघातून गरजु नागरिकांना रेशन दुकानांमध्ये अन्नधान्य पुरवठा व्यवस्थित होत आहे का? असे प्रश्न विचारून पवार साहेब यांनी माहिती घेतली. यासोबत राज्य शासनाकडून तालुक्यात सर्वोतोपरी मदत करण्याबाबत आश्वासनही दिले आहे, असे आमदार शेळके यांनी सांगितले.

आमदार सुनील शेळके म्हणाले की, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन केले पाहिजे. मावळातील नागरिक प्रशासनाला सहकार्य करीत आहेत. सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन होत आहे. प्रशासनाने केलेल्या उपाययोजना आणि नागरिकांची सतर्कता यामुळेच मावळ तालुक्यात अद्याप कोरोनाचे संकट आलेले नाही. त्यामुळे यापुढील काळात अशीच काळजी घ्या, असे आवाहनही शरद पवार साहेब यांनी केले. विशेष म्हणजे, तुम्ही स्वत: काळजी घ्या आणि कार्यकर्त्यांचीही काळजी घ्या, असे आपुलकीचा सल्लाही साहेबांनी दिला. त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईत आम्हाला आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

मावळ तालुक्यातील उपक्रम उल्लेखनीय…

मावळ तालुक्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी कोरोना विषाणुला रोखण्यासाठी अत्यंत अचूकपणे नियोजन केले आहे. ‘सोशल डिस्टंसिंग’ जपण्यासाठी ‘रकाणे पद्धत’, मदत नव्हे कर्तव्य उपक्रम, गरजु नागरिकांना अन्नधान्य वाटप, अन्नछत्रालयाच्या माध्यमातून मोफत जेवण, मोफत भाजीपाला वाटप, पोलीस कर्मचाऱ्यांना सुरक्षा कीट असे विविध उपक्रम आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने मावळात राबवले जात आहेत. यामधील सोशल डिस्टंसिंग आणि मदत नव्हे कर्तव्य उपक्रमाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. विशेष म्हणजे, मावळातील उपक्रम उल्लेखनीय आहेत, असेही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांच्याशी बोलताना म्हटले आहे.