राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर

0
461

कोल्हापूर, दि. २१ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीच्या  तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती कमी होताना दिसत नाही. काँग्रेस – राष्ट्रवादीचे अनेक नेते सत्ताधारी भाजप व शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी उत्सुक  आहे. कोल्हापुरातील पक्षाचे माजी खासदार धनंजय महाडिक  भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

२०१४ च्या मोदी लाटेत  धनंजय महाडिक यांनी  कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून विजय खेचून आणला होता. परंतु यंदा त्यांना  शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्याकडून मोठा पराभव  स्वीकारावा लागला.   आपल्या पराभवाला राष्ट्रवादीमधील  अंतर्गत वाद आणि काँग्रेस नेते कारणीभूत असल्याचा समज महाडिक गटाचा झाला आहे. त्यामुळे महाडिक  यांचे समर्थक  भाजप प्रवेशासाठी आग्रही  आहेत.

दरम्यान, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  या सर्व नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या  पश्चिम महाराष्ट्रात  मोठे खिंडार पडणार आहे.