राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटेंची पत्रकबाजी; दिल्ली दौऱ्यावरून विरोधी पक्षनेते दत्ता सानेंना दिला घरचा आहेर

0
3970

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल सरकारने तेथील सरकारी शाळांमध्ये केलेला कायापालट पाहण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे महापौर, सत्तारूढ पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे गटनेते व विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे तसेच काही अपक्ष नगरसेवक सोमवारी (दि. ८) दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी पत्रकबाजी केली आहे. अशा प्रकारच्या दौऱ्यांमधून काहीच फलनिष्पत्ती होत नाही. त्यामुळे असे दौरे काढण्यापेक्षा शहरात अत्यावश्यक मुलभूत सुविधा पुरविण्याची मागणी कलाटे यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे केली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपवर टिका करण्याबरोबरच कलाटे यांनी स्वपक्षाचे गटनेते दत्ता साने यांनाही घरचा आहेर दिल्याचे मानले जात आहे. तसेच तेथील शाळा पाहणीनंतर भाजप आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक महापालिका शाळांमध्ये काय काय सुविधा पुरवितात, हे पाहणे मनोरंजनाचे ठरणार आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तेथील सरकारी शाळांमध्ये अमूलाग्र बदल केले आहेत. विद्यार्थ्यांनी आधुनिक शिक्षणाची कास धरावी, यासाठी सरकारी शाळांमध्ये सर्व प्रकारचे बदलते तंत्रज्ञान पुरवण्यात आले आहेत. केजरीवालांवर टिका करणाऱ्या भाजपची केंद्र, राज्य आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतही सत्ता आहे. आज त्याच भाजपला केजरीवालांनी शाळांमध्ये केलेल्या बदलाची भुरळ पडली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचे महापौर, सत्तारुढ पक्षनेते यांच्यासह भाजप, शिवसेना, मनसे आणि अपक्षांचे काही नगरसेवक तसेच राष्ट्रवादीचे गटनेते व विरोधी पक्षनेते दत्ता साने केजरीवालांच्या शाळा पाहण्यासाठी सोमवारी विमानाने दिल्लीला गेले आहेत. या दिल्लीवारीची आता गल्लीत चर्चा सुरू झाली आहे. करदात्या नागरिकांच्या पैशांतून विमानवारी करत गेलेल्या या सर्व नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील एक तरी शाळा दिल्लीच्या अरविंद केजरीवाल यांच्यासारखी तयार केली, तर त्यांचे नगरसेवकपद सार्थकी लागेल, अशी भावना शहरातील जनता व्यक्त करत आहेत.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे वाकडचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी शाळा पाहणीच्या या दिल्ली दौऱ्यावरून आयुक्तांना निवेदन देऊन पत्रकबाजी केली आहे. अशा प्रकारच्या दौऱ्यांतून काय फलनिष्पत्ती होते आणि या दौऱ्यांचा शहराला काय फायदा होतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे असे दौरे करून करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करण्यापेक्षा शहरातील नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा पुरवण्याकडे लक्ष देण्याची मागणी कलाटे यांनी केली आहे. महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसायला बाक नाहीत, पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहांची सोय नाही, शिक्षकांची संख्या कमी आहे. अशा परिस्थितीत ई-शाळा ही फार दूरची गोष्ट आहे. शाळांची सुधारणा नसेल, तर ई-शाळा सुरू करून उपयोगच होणार नाही. शहरातील नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधा पुरवल्याच जात नाहीत. साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांना भेडसावणारे हे गंभीर प्रश्न सोडवण्याऐवजी दौरे काढून काय फायदा होणार आहे?, असा सवाल त्यांनी आयुक्त हर्डीकर यांना निवेदनाद्वारे केला आहे.

एवढेच नाही, तर गेल्यावर्षी काही नगरसेवक अहमदाबादला बीआरटी, नदी सुधार प्रकल्प आणि अन्य विकासकामांची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्याला एक वर्ष होत आले, तरी अहमदाबादप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्ये एकही सुधारणा करण्यात आली नाही. त्यामुळे अहमदाबाद दौऱ्यावर नगरसेवकांनी करदात्या नागरिकांचे खर्च केले पैसे अक्षरशः पाण्यात गेले आहेत. ही वस्तुस्थिती असताना आता दिल्लीतील शाळांची पाहणी करून काय दिवे लावणार आहात?, असा जळजळीत सवालही त्यांनी आयुक्तांना केला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांच्या या पत्रकबाजीतून सत्ताधारी भाजपवर टिका करण्याचा उद्देश दिसून येत आहे.

परंतु, दिल्ली दौऱ्यात राष्ट्रवादीचे गटनेते व विरोधी पक्षनेते दत्ता साने हे देखील सामील झाले आहेत. त्यामुळे मयूर कलाटे यांनी दत्ता साने यांनाही घरचा आहेर दिल्याचे मानले जात आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपवर टिका करणारे विरोधी पक्षनेते दत्ता साने हेदेखील या दौऱ्यात सामील झाल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. केवळ आरोप करून काहीच साध्य होत नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसोबत जुळवून घेत आपणही आपला वाटा घेऊन मोकळे होऊयात, हा तर त्यांचा उद्देश नसेल ना?, अशी शंका शहरातील करदाते नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळे दिल्लीतील शाळा पाहणीच्या दौऱ्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक हातात हात घालून पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांमध्ये काय काय बदल घडवून आणतात, हे पाहणे मनोरंजनाचे ठरणार आहे.