Maharashtra

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले शिवसेनेच्या वाटेवर ?   

By PCB Author

September 01, 2019

सातारा,  दि. १ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले  भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा  सुरू असतानाच उदयनराजे  यांनी शनिवारी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये  बऱ्याच वेळ गुजगोष्टी झाली.  त्यामुळे उदयनराजे शिवसेनेच्याही संपर्कात असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

वरूण सरदेसाई यांनी या भेटीचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करून ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता उदयनराजे यांच्या शिवसेना प्रवेशाची शक्यताही नाकारता येणार नाही.  लोकसभा निवडणुकीपूर्वीच उदयनराजे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील जवळीक वाढली होती. त्यामुळे राजे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

मात्र, आता उद्यनराजे  यांनी वरुण सरदेसाईंची भेट  घेतल्याने त्यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.  लोकसभा निवडणुकीनंतर  साताऱ्यातील स्थानिक राजकारणातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. आमदार शिवेंद्रसिंह राजे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता  उदयनराजेही   भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत  असताना त्यांच्या शिवसेनेच्या प्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.