राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचा पराभाव झाल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

0
442

सोलापूर, दि. २४ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे याचा भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पराभव केल्याने एका तरुणाने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी दहाच्या सुमारास घडली.

पांडूरंग शिंदे (वय २५ रा. शिंदेवाडी, ता. माढा) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर पोलीसांनी खासगी रूग्णालयात धाव घेऊन तरूणाच्या प्रकृतीची माहिती घेत जबाब नोंदवून घेतला. या घटनेची नोंद बार्शी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माढा लोकसभा मतदारसंघात यंदा लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून संजय शिंदे यांनी निवडणुक लढविली. निवडणुक प्रचारात संजय शिंदे यांनी जोरदार गावभेट दौरे करून प्रचारात रंगत आणली होती. भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनीही प्रचारात आघाडी घेतली होती, मात्र मतदारांनी दिलेल्या कौलमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदेना पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे नैराश्य आलेल्या पांडुरंग शिंदे यांनी आज शुक्रवार सकाळी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बार्शी पोलीस तपास करत आहेत.