Maharashtra

राष्ट्रवादीची विधानसभेची तयारी; इच्छुकांकडून मागविले अर्ज

By PCB Author

June 26, 2019

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ( फेसबुक ) यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेने कंबर कसली आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षांनीही मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. सर्वच पक्षांमध्ये  अनेक इच्छुक उमेदवार आहेत.  दरम्यान राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. याबाबत राज्यातील जिल्हाध्यक्षांना सुचना देण्यात आल्या आहेत.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार  जयंत पाटील यांनी राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघासाठी इच्छुक उमेदवारीकरीता अर्ज दाखल करण्याबाबत  कार्यक्रम जाहीर केलेला आहे इच्छुक उमेदवारांना  १ जुलै, २०१९ पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. जिल्हाध्यक्षांकडे अर्ज जमा करुन प्रदेश कार्यालयाकडे पाठवावे लागणार आहेत.

त्याचबरोबर प्रदेश कार्यालयाकडे या  ईमेलव्दारे ncp.vidhansabha.application@gmail.com थेट अर्ज करता येणार आहेत. दाखल झालेल्या अर्जांची छाननी ३ जुलैरोजी करण्यात येणार आहे.