राष्ट्रवादीची खासदार अमोल कोल्हेंवर मोठी जबाबदारी ?

0
964

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे. यात तरूण चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. याच एक भाग म्हणून  मुंबईची जबाबदारी खासदार अमोल कोल्हे यांच्या खांद्यावर दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

अमोल कोल्हे यांच्याकडे मुंबईचे प्रभारीपद सोपवण्यात यावे, अशी मागणीही मुंबई युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. मुंबईत अमोल कोल्हे यांच्या चेहऱ्याचा राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होईल. ऐतिहासिक भूमिकेमुळे त्यांचा घराघरात पोहोचलेला चेहरा आणि तरुण वर्गामध्ये त्यांच्याविषयी असलेले आकर्षण पक्षासाठी फायदेशीर ठरेल, असे कार्यकर्त्यांना वाटत आहे.

पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शहरी भागांमध्ये पक्षाचा विस्तार करणे गरजेचे आहे. राष्ट्रवादीचा चेहरा ग्रामीण झाला आहे, ही बाब खरी आहे. त्यामध्ये काही चूक नाही. मात्र, ५० टक्के लोक शहरात राहतात. प्रत्येक तालुक्याचेही नागरीकरण झाले आहे. याकडे दुर्लक्ष करून आपल्याला संपूर्ण राज्यात यशस्वी होता येणार नाही, असे म्हटले होते.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत खांदेपालट होऊन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यातून अमोल कोल्हे यांच्याकडे मुंबईची जबाबदारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून होऊ लागली आहे. मुंबईत राष्ट्रवादीचा संघटनात्मक विस्तार झालेला नाही. यामुळे मुंबईत पक्षाचा विस्तार होण्यासाठी खासदार  कोल्हे यांच्या वलयाचा उपयोग होईल, असे कार्यकर्त्यांचे मत आहे.