राष्ट्रवादीचा राज्यात ५०-५० टक्के जागांचा प्रस्ताव; काँग्रेसच्या निर्णयाकडे लक्ष

0
813

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – मुंबईमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली. यावेळी राज्यात ५०-५० टक्के जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादीने काँग्रेसपुढे ठेवला आहे. या प्रस्तावावर काँग्रेसने भूमिका स्पष्ट केलेली नसून काँग्रेसच्या निर्णयाची राष्ट्रवादी प्रतिक्षा करत आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

आगामी निवडणुकीत जिंकून येण्याच्या निकषावर जागावाटप करण्यावर चर्चा झाल्याचे   राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले. तर ऑक्टोबर अखेर आघाडीची चर्चा पूर्ण होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याचे नवाब मलिका यांनी सांगितले.  यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अशोक गहलोत आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. इतर पक्ष आमच्याबरोबर येणार आहेत, त्यांच्याबरोबरही आम्ही चर्चा करत आहोत. राहुल गांधी आणि शरद पवार यांची बैठक झाली, त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे ऑक्टोबर अखेर आघाडीची चर्चा पूर्ण होईल, अशी माहिती  अशोक चव्हाण यांनी दिली.

दरम्यान, काँग्रेसने २०१४च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात २६ जागांवर आपले उमेदवार दिले होते. त्यापैकी केवळ दोन विजयी झाले होते. तर राष्ट्रवादीने २२ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी चार उमेदवार विजयी झाले होते.