Maharashtra

राष्ट्रवादीकडून विरोधीपक्ष नेतेपदाची ऑफर होती; खडसेंचा गौप्यस्फोट

By PCB Author

October 17, 2019

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच उमेदवारांचा प्रचारही अंतिम टप्प्यात आला आहे. भाजपाने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर खडसे यांना डावलल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्याला विरोधीपक्ष नेतेपदाची ऑफर देण्यात आली होती. तसेच त्यांनी आपल्यासाठी एबी फॉर्मदेखील आणखला होता, असे खडसे यांनी नमूद केले. भाजपा उमेदवार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेदरम्यान ते बोलत होते.

“गेल्या काही वर्षांमध्ये माझ्यावर अन्याय झाला. परंतु आपला जन्म चांगल्या संस्कृतीत झाला. जनतेची साथ मिळत आहे, तोवर मी उभा राहिन. भाजपाने मला राज्यात ओळख मिळवून दिली असून त्यांच्यामुळेच मी ६ वेळा आमदार, विरोधीपक्ष नेता, गटनेतेपद आणि १२ खात्यांचे मंत्रीपदही मिळाले. अशा पक्षाला मी मधून सोडणे योग्य नाही,” असे खडसे म्हणाले. “संजय सावकारे हे गेल्या पाच वर्षांपासून सोबत आहेत. त्यांना उमेदवारी निश्चित होती. उमेदवारी रद्द होईल या भितीने काही जवळचे आमदार दूर गेले,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

“आपल्याला उमेदवारी मिळणार नाही यांची कल्पना दोन महिन्यांपूर्वीच देण्यात आली होती. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चादेखील झाली होती. मला राज्यपालपदाची ऑफर देण्यात आली होती. परंतु राज्यपाल बनून गप्प बसत जनतेला वाऱ्यावर सोडायचे का?,” असा सवाल खडसे यांनी यावेळी केला.