Maharashtra

राष्ट्रपती राजवटीच्या आडून घोडेबाजार भरवण्याचे भाजपाचे मनसुबे – शिवसेना

By PCB Author

November 16, 2019

महाराष्ट्र दि.१६ (पीसीबी) – महाराष्ट्रातला सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. अशात आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांचे सरकार महाराष्ट्राला मिळू शकते. मात्र त्यांच्यातल्या वाटाघाटी अजूनही सुरु आहेत. १७ नोव्हेंबरला म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी सरकार स्थापन होणे अवघड आहे हे दस्तुरखुद्द शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. एवढंच नाही तर अजून बराच वेळ लागेल असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र शिवसेना सातत्याने मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल हे सांगते आहे. या सगळ्या परिस्थितीवर वेट अँड वॉचची भूमिका घेतलेल्या भाजपाने आता सरकार भाजपाचेच येणार असा दावा केला आहे. त्यावर शिवसेनेने कडाडून टीका केली आहे.

सरकार स्थापन करण्यास आम्ही असमर्थ आहोत असं सांगणारे राष्ट्रपती राष्ट्रपती राजवट लागू होताच आता सरकार फक्त आमचेच बरे का! हे कोणत्या तोंडाने सांगत आहेत? राष्ट्रपती राजवटीच्या आड घोडेबाजार भरवण्याचे हे मनसुबे आता उघड झाले आहेत. पुन्हा आमचेच सरकार अशा किंकाळ्यांमुळे महाराष्ट्राच्या कानाचे पडदे फाटत आहेत. अशाने जनतेचे कान बधिर होतील, पण किंकाळ्या मारणाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडेल का? याची आम्हाला चिंता वाटत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर कडाडून टीका करण्यात आली आहे.